पूनम संजय बनसोडे यांची ‘राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग संघर्ष समिती’च्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड –
सेवाभावी कार्याला मिळाले मोठे दाद
मेहकर, प्रतिनिधी – समाजातील वंचित, दिव्यांग, आणि कला-संस्कृती क्षेत्रातील दुर्लक्षित घटकांसाठी आपल्या आवाजाने आणि कृतीने नेहमीच आघाडीवर राहिलेल्या पूनम संजय बनसोडे यांची ‘राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग संघर्ष समिती’च्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीने केवळ पुनम ताईंच्या सामाजिक कार्याची दखल घेतली गेली नाही, तर महिलांना संघटनेत सक्रिय नेतृत्व देण्याची दिशा स्पष्ट केली आहे. त्यांची ओळख एक सजग सामाजिक कार्यकर्ती, संवेदनशील गायिका, प्रभावी वक्त्या आणि सर्वसामान्य महिलांची मदतनीस अशी आहे.
कार्यकुशलतेवर विश्वास, संधीच्या नावावर निव्वळ फोटोबाजी करणाऱ्यांना चपराक
आज अनेक संघटनांमध्ये महिलांना केवळ नावापुरती पदे देण्यात येतात, पण पूनम ताईंसारख्या खऱ्या कार्यकर्त्यांना दिलेले नेतृत्व हे अन्य संघटनांसाठी आरसा ठरावे. अनेक महिलांची कामं गाजत असताना, त्यांना मागे ठेवले जाते. अशा वेळी ही निवड निव्वळ औपचारिक नसून कार्यक्षमता ओळखून दिलेली जबाबदारी आहे, हे विशेष!
समितीचे अध्यक्ष मा. संदीप बोरकर यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून, हा निर्णय संघटनेच्या सामाजिक बांधिलकी आणि भूमिकेचे स्पष्ट उदाहरण मानले जात आहे.
या निवडीप्रसंगी संघटनेचे राज्य संघटक विजय चव्हाण, पांडुरंग सपकाळ, सतीश बोरकर, दुर्गादास काटे महाराज, संजय पवार, आणि शिवाजी काटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी या निवडीचे स्वागत करत, पूनम ताईंच्या नेतृत्वात जिल्ह्यात महिला आणि कलावंतांसाठी नवीन दिशा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पदभार स्वीकारताच ठोस भूमिका
पदभार स्वीकारताच पुनम ताईंनी सांगितले की,
> “दिव्यांग, निराधार, महिला आणि लोककलावंत हे समाजात अजूनही उपेक्षित आहेत. शासनाच्या योजना मजुरांपर्यंत पोहोचत नाहीत. संघटनेच्या माध्यमातून मी या लोकांचा आवाज बनेन. कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्यांपेक्षा आम्ही रस्त्यावर लढायला तयार आहोत.”
त्यांचा हा निर्धार त्यांच्या नेतृत्वाचा ठसा पहिल्या दिवसापासून उमटवतो.